मराठी Blogs
२०१६ मध्ये भारतातून स्वीडनमध्ये सहकुटुंब आलो. मनात अनेक प्रश्न आणि शंका होत्याच. त्यात ३.५ वर्षांची मुलगी. आम्हा दोघांचेही भारतात मराठी माध्यमातून झालेले शिक्षण. मुलीलाही पुण्यात असताना मराठी माध्यमातच घातलेले, थोडीफार हिंदी माहिती होती तिला पण इंग्रजीमात्र अगदीच नावापुरती, तिला हा बदल कसा पचेल आणि रुचेल अशा द्विधा मनस्थितीमध्ये आलेल्या बदलाला सामोरे गेलो. इथल्या शाळेसाठी लागणाऱ्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि सुरू झाला तिचा आणि आमचा एक आगळा वेगळा रंजक प्रवास! इथले शिक्षण म्हणजे अगदीच वर्णन करायचे तर..Finding Nemo चित्रपटांत दाखवलेली शाळा ज्यात शिक्षक खोल समुद्रात आपल्या पाठीवर सर्व माश्यांना घेऊन तिथल्या अद्भूत जगाची सैर घडवतात…. अगदी ह्याच पध्दतीने इथे कुठेही औपचारिक शिक्षण नाही, कुठेही मोठेपणाचे झूल नाही , मुलांच्या मनावर दडपण नाही. आहे काय तर शिक्षक आणि मुलांमधला विश्वास, मैत्री, संवाद, आत्मविश्वास देण्याची क्रिया आणि व्यक्तिमत्त्व घडवण्याची सहज सुंदर आणि नैसर्गिक क्रिया. त्या चित्रपटातील प्रसंग पाहून खरोखर अश्या शाळा तर स्वप्नवत झाल्या आहेत असे वाटले.पण इथे येऊन अश्या शिक्षणाची प्रचिती आणि अनुभव आला. सगळ्या जगामध्ये युरोपातील शिक्षण का महत्वाचे ह्याची खात्री पटली. इथल्या शिक्षणाची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. १.खरे शिक्षण इथे घरातून च सुरू होते. स्वीडिश लोक अगदी लहानपणापासून च मुलांना एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असेच गृहीत धरतात. २. मुलांना वाढवताना देखील त्याचा एक व्यक्ती म्हणून खूप बारीकसारीक गोष्टीतून विचार करतात. जसे अगदी एक वर्षाच्याखालील बाळालादेखील क्वचितच त्याची आई खाऊ घालताना दिसते. 3. साधारण मूल बऱ्यापैकी स्वावलंबी झाले की साधारण दीड वर्षाच्या मुलाला शाळेत घातले जाते. ४. मूल १ वर्षाचे होईपर्यत इथे आईला ६ महिने व वडिलांना ६ महिने अशी रजा मिळते. ५.मग १ वर्षाच्या ह्या काळात मुलांना नियमितपणे वाचनालयात घेऊन जाणे, बागेत मनसोक्त खेळू देणें, पुस्तक ओळख करून देणे, अनौपचारिक स्वावलंबनाचे धडे देणे हे सर्व येते. ६. घरात मुलांशी पालक फक्त आणि फक्त मातृभाषेत म्हणजे स्वीडिश मध्ये बोलतात. ७. खास मुलांच्या दृष्टीने तयार केलेली वाचनालये अत्यंत आधुनिकरित्या खेळता खेळता मुलांची पुस्तकांशी मैत्री करून देतात. वाचनालयांमध्ये छोटेखानी चित्रपट गृहापासून ते 3d पुस्तके, पॉप अप पुस्तके अगदी सहज सुंदर रित्या मुलांना पुस्तकांजवळ नेतात. ह्याशिवाय वाचनालयांमध्ये विविध प्रकारची गाणे, गोष्टी, वाद्य वाजवायला शिकवणे हे अगदी सहज असते. मुलांना गोष्ट कशी सांगावी ह्याचे पालकानाही मुलांबरोबर गोष्ट ऐकत ऐकत सहजरित्या ह्याचे प्रशिक्षण मिळते. ८. वाचनालयात असते एक विशेष खोली जिथे मुले विविध कलात्मक गोष्टी करतात. जसे मुक्तपणे कॅनव्हास वर चित्र काढणे, शिवण काम, क्राफ्ट, लोकरकाम ह्या सर्व गोष्टी मुले समूहीक उत्साहाने उत्स्फूर्तपणे करतात. ह्या सर्व गोष्टींसाठी लागणारे साहित्य अत्यल्प दरात मुलांना मुबलक पणे उपलब्ध असते.
तर मंडळी मागच्या भागात आपण स्वीडनची वाचनालये व त्यासंबंधित माहिती पाहिली. इथल्या स्वीडिश शाळांविषयी बऱ्याच चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या म्हणून आम्ही रेवतीला bilingual शाळेत घातले.तिचा इंग्रजी व स्वीडिश अश्या दोन्ही भाषांशी संपर्क राहावा हा ह्यामागचचा हेतू होता. शिवाय घरात फक्त आणि फक्त मराठी भाषेतच बोलायचे असा आमचा तिघांचा अलिखित करार झाला होता. शाळा प्रवेशासाठी इथल्या एका मराठी मैत्रिणीने आम्हाला खूप मदत केली. आम्हाला हा छान अनुभव देण्यात अर्चना नावाच्या माझ्या स्वीडनमधील पहिल्या मराठी मैत्रिणीचा मोलाचा वाटा आहे.ह्याबद्दल आम्ही तिचे सदैव ऋणी राहू.आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि रेवतीची शाळा सुरु झाली. संबंधित शिक्षकांनी पालकांपैकी एकाने पहिल्या तीन दिवस पाल्याबरोबर शाळेतच साधारणपणे ३ तास राहायचे हे आधीच सांगितले होते.यामागचे कारण म्हणजे पालकांनाही कळते की शाळेत नेमके काय काय होते , मुलांना कसे शिकवले जाते व मुलांनादेखील नवीन वातावरणात रुळायला सोपे जाते. तयारीनिशी मोठ्या उत्साहात मी आणि रेवती शाळेत पोहोचलो. माझ्या डोक्यात भारतातल्या आम्ही शिकत असलेल्या मराठी शाळेचे चित्र पक्के कोरले गेले होते. त्यामुळे पूर्वग्रहावर आधारित शाळेचे चित्र रेखाटत मी, माझी मुलगी व नवरा शाळेच्या वाटेवर निघालो. साधारणपणे ३५ मिनिटांचा मेट्रोचा प्रवास खूप गंमतशीर होता. शाळेत पोहोचल्या बरोबर सर्वात आधी लागले ‘रेड पार्क ‘(हे मुलांनी ठेवलेले नाव असावे बहुदा). छोटेखानी अश्या बागेत अनेक साधारणत: २-३ वर्षांची मुले मुक्तपणे बागडताना पाहिली. सर्व मुलांच्या अंगात त्यांच्या वर्गाचे विशिष्ट रंगाचे जॅकेट होते ज्यावर शाळेचे नाव व फोने नंबर लिहिलेला होता. साधारणपणे २-३ शिक्षक (एकमेकांशी फारच कमी गप्पा मारत) मुलांशी खेळत व गप्पा मारत होते. मुले ही शिक्षकांना नावाने हाक मारून त्यांच्या बरोबर व आपापसात मनसोक्त खेळत होते. कुणी झोके घेत, कुणी घसरगुंडी खेळत होते तर काही धीट मुले तिथल्या खेळण्यांनां लटकत होते. शिक्षक शाळेत येणाऱ्या त्या गटाच्या पालकांचे व मुलांचे हसून स्वागत करत होते. संबंधीत पालकही मुलांना तिथूनच टाटा करून आपापल्या दिनक्रमासाठी निघून जात होते.मुले ही आनंदाने आवडत्या शिक्षकाला आनंदाने मिठी मारत होते. नवीन भारतीय पालक पाहून छान हसून त्यांनी देखील आमचे स्वागत केले. त्यांच्या त्या हसऱ्या स्वागताने आम्हीही भरून पावलो. पुढे मुख्य शाळा जी ह्या रेड पार्क पासून फक्त २-३ मिनिटांच्या अंतरावर होती. शाळेची लाल इमारत अत्यंत आकर्षक होती. शाळेच्या समोरही एक छोटी बाग होती. बागेमध्ये मधल्या चौकोनी भागात माती व त्यावर छानशी छोटीशी घसरगुंडी होती. तिथेच एक छोटी खोली होती त्यात मुलांच्या रोजच्या खेळण्यासाठी लागणारे सामान होते जसे प्लास्टिकचे छोटे फावडे, कुदळ ,छोट्या बादल्या, विविध रंगांचे व आकाराचे चेंडू, बॅट , हॉकी स्टिक , दोरीवरच्या उडया इ . तिथेच मुलांसाठी बनवलेल्या चार ते पाच छोट्या व मोठ्या सायकली होत्या ज्यावर मुले बिनधास्त रेस डबलसीट बसून खेळत होती. काही मुले टेपरेकॉर्डर वर लावलेल्या गाण्यांवर नाचत होती, काही पळत होती ,काही भांडत होती तर काही जोडी जोडींमध्ये गप्पात दंग होती. संतांना अंगाखांद्यावर घेऊन उभ्या लेकुरवाळ्या विठोबाला तुम्ही कदाचित चित्रात बघितले असेल पण त्याच लेकुरवाळ्या विठू माउलीला मी प्रत्यक्ष बघत होते मुलांना अंगाखांद्यावर घेऊन खेळणाऱ्या इथल्या प्रेमळ शिक्षकांच्या रूपांत…. ह्याची देही ह्याची डोळा!
जर शाळा बाहेरून एवढी छान आहे तर आतून कशी असेल ह्याची उत्सुकता होती. शाळेत प्रवेश केल्याबरोबर सगळ्यात आधी पहिले ते एका छोट्या खोलीत मुलांचे कपडे विशेष करून हँगरला लटकवलेले जॅकेट्स,टोप्या , बूट व मुलांचे इतर सामान त्यांच्या छोट्या कप्प्यांमध्ये त्यांचे सामान ठेवले होते. प्रत्येक कप्प्यावर मुलाचे नाव , त्याचा फोटो, त्याच्या देशाचा झेंडा + स्वीडनचा झेंडा असे मार्किंग होते.मुलांच्या कप्प्यांमध्ये त्यांना आवडणाऱ्या घरून आणलेल्या विशेष गोष्टी होत्या जसे कुणाच्या कप्प्यात बाहुली , तर कुणाच्या कप्प्यात कार्टून ची उशी , कुणाच्या कप्प्यात कार तर कुणाच्या कप्प्यात आवडते ब्ल्यांकेट. अश्या विविध गोष्टी पाहून गम्मत वाटली. काचेच्या भिंती असल्येल्या वर्गांमधून सर्वकाही स्पष्टपणे पाहता येईल अशी प्रत्येक वर्गाची रचना होती. वर्गापासून जवळच स्वतछता गृहे होती. त्यामध्ये लहान मुलांना सहजरीत्या बसता येईल अशी छोटेखानी व्यवस्था होती.
नोटिस बोर्डावर शाळेच्या आठवड्याभराच्या कामाचा प्रत्येक वर्गाचा अहवाल लावला होता त्यात मुलांचे व शिक्षकांचे वेगवेगळ्या activities करताना चे फोटो होते.
वर्गात गेल्यावर रेवतीचे व माझे सर्व शिक्षकांनी हसून स्वागत केले व त्यांच्या दिनक्रमाला त्यांनी सुरुवात केली. वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या तरीही स्वीडनच्या शिक्षणव्यवस्थेशी एकरूप झालेल्या त्या शिक्षकांचे कौतुक करावे तितके कमीच. वर्गाचा दिनक्रम जाणून घेण्याआधी इथे काही गोष्टी आहेत जसे पूर्व शालेय विभागात
१ . मुले डब्बा घरून आणत नाहीत.
२. रोज मुलांना आपण शाळेत ज्या वेळेस सोडणार आहोत व घेऊन जाणार आहोत ह्याची पूर्वकल्पना शाळा सुरु होण्याआधीच पालकांना द्यावी लागते. सर्वसाधारणपणे बरेच भारतीय पालक मुलांना ६ तास शाळेत ठेवतात त्याला कारण आजूबाजूला खेळण्यासाठी मुले नसल्यामुळे व इथल्या वातावरणामुळे मुले जास्तीत जास्त शाळेत राहणे पसंत करतात. इथे नोकरी करणाऱ्या पालकांना वेगळे पाळणाघर शोधण्याची गरज नसते कारण शाळाच इथे पाळणाघराचे काम करतात. पूर्वशालेय विभागात ह्यासाठी वेगळे पैसे भरावे लागत नाहीत पण शालेय विभागात मुलांना शाळेत शालेयवेळा व्यतिरिक्त ठेवण्यासाठी फीस व्यतिरिक्त वेगळे पैसे भरावे लागतात.
३. फक्त सहलीच्या दिवशीच मुलांना घरून डब्बा नेता येतो. बाकी सर्व वेळेस मुलांचे जेवण शाळेत असते.
४. साधारणपणे प्री -स्कूल मध्ये गणवेशाऐवजी मुलांना शाळेचे नाव व फोन नंबर असलेले जॅकेट्स दिले जातात जेणेकरुन खेळताना किंवा सहलीच्यावेळी शिक्षकांना आपल्या गटातील मुलांना शोधणे सोपे जाते.
५. इथल्या मुलांना फूड अलेर्जी चे प्रमाण खूप असल्यामुळे घरून ड्राय फ्रुट्स किंवा इतर कोणतेही दुधाचे अथवा इतर पदार्थ आणण्यास मनाई असते.
वर्गातील दिनक्रम म्हणला तर साधारणपणे सगळ्यात आधी शाळा सुरु झाल्यावर प्ले टाइम नंतर मुले वर्गात येतात व गोलाकार बसून सगळ्यात आधी फ्रुट टाइम असतो. ऋतूनुसार उपलब्ध असलेली फळे शिक्षक धुवून एका टोपलीमध्ये कापून ठेवतात. आपल्याकडे जसे आपण जेवणाआधी “वदनिकवल घेता नाम घ्या श्रीहरी चे” हा श्लोक म्हणून जेवण्यासाठी सुरुवात करतात त्याचप्रमाणे इथे देखील काही खाण्यापूर्वी जेवणाच्या, फळांच्या गाण्यांनी मुले खाण्याची सुरुवात करतात.
वर्गात किती मुले आहेत ते मुलेच आपापला क्रमांक उच्चारून मोजतात आणि नकळत अंकांशी खेळतात. मग ह्या सर्कल टाइम मध्ये गाणे गोष्टी गप्पा मधून अनौपचारिकरीत्या मुलांची गणिताशी गट्टी जमायला सुरुवात होते. हसतखेळत आपण बरेच काही शिकत आहोत हे मुलांनाही कळत नसतं. सगळ्यात महत्त्वाचा हा सर्कल टाइम असतो कारण ही अगदी सकाळची वेळ असते. मुले नुकतीच खेळून आल्यामुळे एकदम उत्साही असतात आणि पुर्णपणे नवीन गोष्टींच्या आकलनासाठी तयार असतात. त्यामुळेच अनेक नव्या गोष्टी मुले, ह्या सकाळच्या सुरवातीच्या अर्ध्या तासातच सहजपणे शिकतात.
तसेच सर्व प्रकारची फळे आपापल्या हाताने खाण्याची सुरुवात हि इथूनच होते.
स्वीडन मध्ये मुख्यतः ४ ऋतू आहेत. ते म्हणजे Winter,Spring, Autumn , Summer . इथले शिक्षण जवळून पाहताना हे प्रकर्षाने लक्षात आले की शिक्षण आणि ऋतू ह्यांची गुंफण किती सुंदर प्रकारे करता येते.
साधारणपणे ऋतू बदलले की वेगवेगळे सण आले आणि त्याचबरोबर निसर्गात होणारे बदल देखील आले. ऋतू व त्यामधील होणाऱ्या सणावारांवर इथले शिक्षण आधारित आहे. जेव्हा माझ्या मुलीची शाळा सुरु झाली तेव्हा Autumn म्हणजेच पानगळतीचा मौसम सुरु होता. मग काय शाळेत असणाऱ्या आठवडी सहलीमध्ये मुलांना झाडांची वेगवेगळ्या रंगांची,आकाराची पाने गोळा करणे , जंगलातून वेगवेगळ्या आकाराच्या ,उंचीच्या काड्या गोळा करून आणणे, त्या काड्या वेगवेगळ्या रंगानी रंगवणे असे उपक्रम असायचे. शाळेत मुलीला आणायला गेल्यावर जंगलातील झालेल्या पानगळीला वर्गात एक नवे आयुष्य मिळालेले दिसायचे आणि त्या पानांना देखील ह्या चिमुकल्यांच्या उपक्रमातून एक नवीन जीवन लाभलेले दिसायचे. परत तिच्या गप्पांमधून जाणवायचे ते निसर्गात झालेले बदल. शिक्षक मुलांना जंगलामध्ये सहलीला घेऊन जायचे तेव्हा वेगळेवेगळे पक्षी, झाडांमधले बदल मुलांना हसत खेळत गप्पा मारत समजावून सांगायचे. मग तुरु तुरु चाललेल्या लेडी बग कडे वर्गातील सगळ्या मुलांनी कुतूहलाने तासंतास पहिले नाही तर नवलच.
शाळेतून परतीच्या प्रवासात लेकीकडून इथल्या जंगलांविषयी ,पक्ष्यांविषयी, कीटकांविषयी , झाडांमधल्या बदलांविषयी मलाही नवनवीन माहिती मिळू लागली. आज इथल्या व जगातील अनेक गोष्टींची माहिती ती गप्पांमधून सहजपणे सांगते. हे केवळ माझ्या मुलीबाबतच नाही तर स्वीडनमधील तिच्या वयाची सर्व मुले जगातील खंड, समुद्र, देश, दक्षिण ध्रुव , उत्तर ध्रुव ह्याविषयी अगदी सहजपणे माहिती देऊ शकतात.
नंतर आला हिवाळा. इथला हिवाळा म्हणजे खरोखर तापदायक. सूर्य उगवणार सकाळी ८ वाजता आणि मावळणार दुपारी २ वाजता. हे ऐकूनच सुरवातीला खूप ताण आला होता कारण येथील आमचा तो पहिलाच हिवाळा होता. इथे शाळेत -६ , -१० तापमानात देखील सहलीला नेतात हे एकून तर स्वेटर घालून सुद्धा मला थंडी वाजून आली. इथले लोक नेहमी म्हणतात ‘ Weather is never bad in Sweden , your clothes are bad’ . खरोखर इथल्या वातावरणाचा सामना करायचा तर सगळ्यात आधी मुलांना इथल्या वातावरणानुसार कपडे पाहिजेत . ज्यात प्रामुख्याने हातमोजे , स्वेटर्स, टोपी , हिवाळी बूट , हिवाळी कोट असे सर्व कपडे शाळेने दिलेल्या यादीप्रमाणे प्रमाणे लागणारे कपडे घेऊन आम्ही हिवाळ्याच्या स्वागतासाठी तयार झालो.
हिवाळ्यातही मुलांच्या निसर्ग सहली तर साधारणपणे दररोज असत. इथे आपापल्या शाळेची जॅकेट्स घातलेली मुले शिस्तीत एका ओळीत पुढे एक शिक्षक व मागे एक शिक्षक असे नेहेमीच रस्त्याने जाताना दिसतात. अगदीच छोटी मुले असतील तर एका जाड दोरीला पकडून कोणत्याही प्रकारचा आरडा ओरडा , गोंधळ न करता शिक्षकांबरोबर चालताना दिसतात. बागेत पोहोचल्यावर मात्र हवा तितका दंगा करतात ही छोटी मंडळी. निसर्गाशी मैत्री करत करत ही छोटी सेनाआपल्या शिक्षकांबरोबर प्रत्येक ऋतूमध्ये त्यांच्या शालेय जीवनाचा आनंद घेतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तर बागांमधून ही मुले स्नो मॅन करत हिवाळ्यात धम्माल करतात.
हिवाळ्यात शाळेमध्ये मुले कातर काम करताना स्नो फ्लेक्स करणे , स्नो मॅन तयार करणे, चित्र काढणे , चित्र रंगवणे ह्या गोष्टी करतात.motor skills वर इथे विशेष भर दिला जातो. वर्गात विविध प्रकारचे खेळणे असतात.त्यातील काही मणी ओवणे, वेगवेगळे पझल, चेस, सापशिडी , विविध प्रकारच्या क्ले तसेच खास मुलांसाठी तयार केलेले स्वैपाकघर व छोटी छोटी भांडी असे वैविध्य पूर्ण साहित्य वर्गात उपलब्ध असते. सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे इथे मुलांना सापशिडी ह्या खेळातून counting शिकवले जाते.
हिवाळ्यामध्ये इथे बर्फावरून घसरण्याच्या अनेक घटना घडतात. मुले बर्फावरून घसरू नयेत म्हणून शाळांमधून आधीच balancing गेम्स घेऊन त्यांची हिवाळ्याची तयारी केली जाते.
क्रिसमस च्या काळात तर वर्गात मुले धमाल करतात कारण शाळा जरी बंद असल्या तरी इथे विविध वाचनालये, नाट्यगृहे, museum मध्ये खास मुलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.
इथला पहिला हिवाळा आणि शाळेची नवी नवलाई अनुभवत आमचा हा रंजक प्रवास आम्हाला आणि रेवतीला अनुभव समृद्ध करत होता. त्या दिवशी रेवतीला शाळेत आणायला गेले आणि पळत पळत बाहेर येऊन आवेगाने तिने मला मीठी मारली. ती आनंदाने म्हणाली “आई , आज शाळेत आम्हाला ब्रेड करायला शिकवला आणि मी तुझ्यासाठी ब्रेड आणलाय” असे म्हणून तिने पटकन एक ब्रेड चा तुकडा मला भरवला. वर्गात बघते तर सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आपल्या हाताने रंगवलेले ऐप्रन घालून, हे बालगोपाल आपल्या लाडक्या शिक्षकांबरोबर ब्रेड खात बसले होते. आयुष्यात ब्रेड एवढा कधीच चविष्ट लागला नव्हता जो त्या दिवशी खाल्ला. शाळेतून येताना तर मग रस्ताभर आम्ही ब्रेड कसा बनवला ह्याची पाककृती ऐकता ऐकता घर कधी आले ते कळलेच नाही. डिसेंबर मध्ये ख्रिसमस च्या वेळी थंडीत इथे पेपर काकुर म्हणजे अद्रक व दालचिनी असलेली बिस्किटे खूप प्रमाणात खातात. मग त्या दरम्यान रोज शाळेतून येताना नवनवीन पाककृती आमची भावी सुगरण सांगू लागली.मुलांनी बनवलेल्या ह्या सर्व पाककृतींचा ख्रिसमस पार्टी ला आम्ही सर्व पालकांनी आस्वाद घेतला. आपण काहीतरी आईबाबांनसाठी केले ह्याचा आनंद सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. मग मुलांनी म्हणलेली ख्रिसमस ची गाणी ऐकता ऐकता साखर न घातलेली कॉफी पण गोड लागायला लागली होती. ह्यांच्या ख्रिसमस आणि लुसिया (ख्रिसमस आधी येणारा सण) च्या गाण्यांमध्ये देखील निसर्ग वर्णन खूप सुरेखपणे केलेले असते आणि हे वर्णन ऐकता ऐकता वेगवेगळ्या देशांमधील पालाकांनादेखील देखील मुलांबरोबर इथल्या संस्कृती ची ओळख होते .
ह्या पाककलेचे अविष्कार आमच्या स्वैपाकघरात हळू हळू डोकावू लागले. मी स्वैपाकघरात असताना सलाड डेकोरेशन करणे , वेगगळ्या सलाड च्या रेसिपी शोधून काढणे सुरु झाले. त्याच बरोबर जेवण झाल्यावर टेबले पुसून घेणे , भांडे कोरडे करण्यास मदत करणे , कुठे कचरा दिसला तर तो उचलणे , कुणी पाहुणे आले तर त्यांना पाणी नेवून देणे ह्यात आमची खारुताई आपला वाटा उचलू लागली. कारण शाळेमध्येच काम झाले की सर्व गोष्टी जागेवर जाऊ देणे ,शिक्षकांना मदत करणे ह्या सर्व गोष्टींचे हसतखेळत प्रशिक्षण रोज मिळतच असते. आजही क्लीन अप चे शाळेतील गाणे यू टयूबवर लावले की तिची खोली कशी लख्ख झालेली असते.
बर्फाच्या काळात एक प्रसंग तर खूपच लक्षात राहिला . एक दिवस शाळेत रेवतीला घ्यायला गेले. पहाते तर काय पांढऱ्या शुभ्र बर्फावर शिक्षकांनी अनेक रंग पसरवले होते आणि त्यात ही मुले मनसोक्त खेळत होती. बर्फातली ही मुलांची रंगपंचमी तर कायम लक्षात राहील.
हिवाळा संपत येत होता आणि आता स्प्रिंग सुरु होत होता. शाळेतही वेगवेगळ्या उपक्रमांमधून स्प्रिंग चे जोरदार स्वागत होत होते. एक दिवस वर्गात माती असलेले छोटे छोटे काचेचे अनेक ग्लास दिसले. कुतूहलाने रेवतीला मी त्याबाबत विचारले तेव्हा कळाले की वर्गात प्रत्येक मुलाला एक बिन देण्यात आले आहे आणि प्रत्येकाने आपापल्या ग्लासमध्ये बी पेरले होते. मग दर आठवड्याने मोठ्या होणाऱ्या वेलाबरोबर मुलांचा अनुभवही मोठा होऊ लागला होता. स्प्रिंगमध्ये च इस्टर सणाच्या वेळी छोटी छोटी अंडी रंगवणे, पेपर नॅपकिनच्या उरलेल्या रोल पासून विविध पक्षी, बाहुल्या मुले अवलिया करू लागली होती. शाळेतील ह्या सर्व उपक्रमांमुळे रेवतीच्या पेन्सील धरण्याच्या पद्धतीत खूपच बदल दिसत होता. A, B, C (capital आणि small ) लिहिणे हे ती केवळ महिन्याभरात अत्यंत कमी सरावात शिकली होती.
स्प्रिंग संपत आला आणि पालक सभेचे वेध लागले. आता किती दिवे लागलेले दिसणार ह्या कल्पनेने मी थोडी बैचन झाले. पालक सभा म्हणजे अभ्यासात किती प्रगती झाली किंवा कुठे कुठे सुधारणेला वाव आहे ह्याचा आढावा साधारणपणे आपलाल्या डोक्यात असतो. पण ह्या पहिल्या पालक सभेने तर आमचा ह्या शिक्षण संस्थेविषयीचा आदर आणखी दुणावला. पहिल्या पालक सभेत आम्हाला आमच्या पाल्याची इतर मुलांशी असलेली वागणूक, वर्गातील वागणूक,शिक्षकांशी वर्तणूक, इतरांना देण्यात येणार आदर, त्याच्या सवयी ह्याविषयी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर पाल्याच्या motor स्किल्स विषयी माहिती सांगण्यात आली. सगळ्यात मनात कोरले गेले ते तिच्या शिक्षकांचे वाक्य आम्ही ह्या वयात “अभ्यासापेक्षा एक चांगला माणूस घडवण्याला जास्त महत्व देतो. कारण एक चांगला माणूस पुढे नक्कीच यशस्वी होतो.” ह्या पालक सभे नंतर आम्ही पण खूप समाधानी होतो कारण तो घडणारा चांगला माणूस आम्ही अनुभवत होतो.
अश्याप्रकारे बघता बघता स्वीडनमधील bilingual पूर्वशालेय शिक्षणाची आमची दोन वर्षे भुर्रकन उडून गेली होती.ह्या दोन वर्षांचा आढावा घेताना एक लक्षात आले, रेवती बरोबर आमच्यातही अनेक बदल होत होते.अगदीच सांगायचे झाले तर अजुनही आम्ही चुकांमधून शिकणारेच पालक आहोत.संगोपनात होणाऱ्या चुकांमधून शिकताना देखील आपल्यातल्या नव्याने जन्मणारया पालकाला बघताना छान वाटत होते.
रेवतीचे गुरु हळूहळू आमचेही गुरु होवू लागले होते.त्यांच्याकडून शिकलो मुलांशी संवाद साधताना खाली बसून,त्यांच्याच उंचीचे होवून अगदी शांतपणे त्यांच्याशी बोलून कुठलाही प्रश्न सोडवणे, मुलांना थोडा वेळ देवून त्यांना त्यांच्या चुका समजू देणे, ते व्यक्त होत असताना शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकणे, त्यांच्या मतांचा आदर करणे,प्रसंगी मुल कितीही आक्रस्ताळेपणा करत असले तरी आपण शांत राहणे,आपली मते कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर न लादता संवाद साधून त्यांना आपले म्हणणे चर्चेतून पटवून देणे आणि त्याला नैसर्गिक रित्या व्यक्त व्हायला घरात पूरक वातावरण तयार करणे.
खरे सांगायचे झाले तर आम्ही आणि रेवती एकाच बोटीचे प्रवासी झालो होतो तिचे वय ५ झाले होते आणि आम्ही पाच वर्षांचे पालक झालो होतो. त्यामुळे “No one is perfect” ह्या उक्तीप्रमाणे तिच्या शैक्षणिक प्रवासाबरोबर बरोबर आमचीपण smart parenting कडे वाटचाल सुरु झाली होती.ह्याची पावतीही हळूहळू मिळत होती जेव्हा लेक वर्गातल्या सगळ्या गोष्टी(ज्या मुले generally घरी सांगत नाहीत) बिनधास्तपणे घरी गप्पांमध्ये सांगत होती.
दरम्यान जगातील उत्कृष्ट शिक्षणपद्धती असलेल्या फिनलंडला फिरायला गेलो तेव्हा ह्या शिक्षणाविषयी सांगताना बसमधील निवेदक म्हणाली शिक्षणाच्या बाबतीत “Less is more” ह्या तत्वावर आम्ही विश्वास ठेवतो. ह्याच शैक्षणिक तत्वाचे इथेही अनुसरण करतात. साधारणपणे वर्गातील कोणतीही activity १५-२० मिनिट करतात. मग तो वाचनाचा वेळ असो किंवा वर्गाभ्यासाचा वेळ असो.ह्या पद्धतीचा फायदा असा लक्षात आला की मुले ती गोष्ट खूप मन लावून करतात. जसे घरात असताना रिकाम्या वेळात मुलांना एखाद्या गोष्टीकडे पाहताच त्याचे काय काय करता येइल ह्या विषयी झटक्यात वेगवेगळ्या कल्पना सुचू लागतात, जसे टिशू पेपर पासून फुले, पेपर डिश पासून मासे, पक्षी करणे,असो किंवा मित्र मैत्रिणीच्या वाढदिवसाला पॉप अप ग्रीटिंग कार्ड करायचे असो, ही उत्साही सेना १० ते २० मिनीटात तुम्हाला सुचणारही नाहीत इतक्या अद्भुत गोष्टी करून दाखवतील! अश्या अद्भुत गोष्टींचा अविष्कार इथल्या वर्गांमध्ये सुंदररित्या बघायला मिळतो.इथला वर्ग म्हणजे भविष्यातल्या कलाकारांचे पाळण्यातले विश्व!
शालेय उपक्रमांपैकी महत्त्वाचा उपक्रम म्हणजे आठवडी सहल. दर आठवड्यात या वानरसेनेला घेवून, हे शिक्षक विविध Museum ला भेटी देतात. युरोपभर विविध प्रकारची संग्रहालये आपल्याला बघायला मिळतात. नव्या व जुन्या वस्तू जतन करून त्यातून आपल्या संस्कृतीची ओळख जगाला व नवीन पिढीला करून देणे हा देखील युरोपिअन संस्कृतीचा एक महत्वाचा भाग.
स्वीडनमध्येही अनेक प्रकारची Museum बघायला मिळतात. त्यातील काही Museum ची माहिती मी इथे देत आहे. (स्पेलिंग स्वीडिश भाषेत आहेत, जेणेकरून तुम्हाला आंतरजालावर शोधणे सोपे जाईल) जसे Polis Museum – ज्यात पोलीस दलाबद्दल माहिती, विविध गुन्हे, गुन्ह्यांचा शोध घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, स्वीडन मधील कायदे व गुन्हे ह्यासंबंधी माहिती, Mari Time Museum – ज्यात अनेक प्रकारचे पृथ्वीगोल, स्विडनच्या सागरीसंपत्तीविषयी माहिती, सागरी जीवन, मोठ्या जहाजांच्या अंतरभागातील रचना, विविध जहाजे, खलाशांची प्रवास वर्णने, खलाशी जीवनाबद्दल माहिती, Tekniska Museum- इथे विविध तंत्रज्ञानाविषयी माहिती, पर्यावरणाविषयी माहिती,सध्या जगासमोर असलेले पर्यावरणाचे प्रश्न, उर्जानिर्मितीची विविध तंत्रे, तसेच संगणकावर आधारित विविध वर्चुअल गेम्स. Nordiska Museum – स्वीडिश लोकांचे वेगवेगळ्या काळातील राहणीमान, खाद्यसंस्कृती, महत्वाचे सण-समारंभ त्यातील पोशाख, येथील कलाविश्व व त्यातील शोध, Vasa Museum – हे १६२८ साली बुडलेले जहाज, त्याच्याशी निगडित इतिहास, जहाजात बुडलेल्या लोकांचे सांगड़े त्यांच्या विविध वस्तु. Ark desk Museum – ज्यात वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थापत्य कला ते आधुनिक स्थापत्य कलांचा प्रवास, Modern Museum – ज्यात potography व विविध चित्रांचे प्रदर्शन.
इथल्या museum चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांना खेळता खेळता अनेक गोष्टी शिकता येतील अशी रचना असते. तसेच पडद्यावर विविध प्रकारच्या छोट्या फिल्म्स देखील Museum मधील त्या भागाचा संक्षिप्त आढावा देत असतात. Museum भेटींमधून मुलांवर झालेला परिणाम दृश्य स्वरूपात लगेच दिसत नसला तरी त्याचे दूरगामी परिणाम त्यांच्या ज्ञानामध्ये झालेल्या वाढीतून दिसून येतात.
स्विमिंगचे प्रशिक्षण हा देखील शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग. स्वीडनमध्ये प्रत्येक ५ वर्षापुढील मुलाला पोहणे हे आलेच पाहिजे असा ह्या लोकांचा ठाम आग्रह आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा शिक्षकांबरोबर पोहण्याचा आनंद इथली मुले घेतात. हिवाळ्यामध्ये Ice Skating हा देखील अनेक उपक्रमांपैकी एक उपक्रम शिक्षकांबरोबर मुले करतात.आयुष्यात आपण न केलेल्या गोष्टी मुलांना करताना बघतानाचा आनंद खरोखर सुखावून जातो.
शाळेच्या उपक्रमांपैकी एक म्हणजे “शो एंड शेअर”. ज्यात मुले आपापल्या घरुन त्यांच्या आवडीचे खेळणे, पुस्तक किंवा एखादी गोष्ट घेवून येतात आणि सर्व वर्गासमोर त्या खेळण्याविषयीच्या आठवणी सांगून व्यक्त होतात नन्तर सगळी मुले आणलेली खेळणी एकत्रितपणे खेळतात. पहिल्या काही दिवसांमध्ये आमच्या बाई काहीही न बोलताच घरी यायच्या पण आता मात्र २ दिवस आधीपासून ती ह्या उपक्रमाची वाट बघत असते. वेगवेगळ्या विषयांवर उत्स्फूर्त बोलणे, सभाधीटपणा, इतरांनी दिलेल्या प्रश्नांची मुद्देसूद उत्तरे देणे असे अनेक गुण नंतरच्या काळात दिसू लागतात.
विविध ऋतूनमध्ये होणाऱ्या जंगल भेटींबरोबरच शहरातील वेगवेगळ्या बगीच्यांना भेटी हा देखील एक उपक्रम शाळेत चालतो. ज्यात मुले बागांमध्ये खेळता खेळता पाळीव प्राणी बघतात, त्यांना चारा भरवतात आणि त्याचबरोबर मित्रांबरोबर देखील धम्माल करतात.
शाळेत जसा मानसिक विकासावर भर दिला जातो तसाच शारीरिक विकासावर सुद्धा. इथल्या शाळांच्या उपक्रमांपैकी एक भाग म्हणजेच योगाभ्यास. केवळ मुलेच नाही तर इथले शिक्षक देखील विविध प्रकारची अवघड योगासने करण्यात तरबेज असतात. इथल्या अनेक शिक्षकांशी बोलण्यातून लक्षात आले की खास योगाभ्यास शिकण्यासाठी हे मुंबई, पुद्दुचेरी, केरळ अश्या भारतातील विविध भागांना भेटी देतात. त्यांचे भारतातील अनुभव ऐकून व योगाकडे पाहण्याचा आदर पाहता आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.
योगासने शिकवताना तर इथे फारच रंजक पद्धतीने शिकवतात. मुले इथे त्यांच्या आवडतीच्या कार्टून व्यक्तिरेखेची गोष्ट ऐकत ऐकत योगाभ्यास करतात. एल्सा आणि आना ही नावे आता डिझनी कृपेने जगभरात माहीत झाली आहेत. अश्या आवडीच्या एल्सा च्या गोष्टी ऐकत ऐकत मुले अगदी सहजपणे योगासंनांमध्ये पारंगत होतात. आजही सकाळी TV वर आवडत्या कार्टूनची गोष्ट ऐकताना रेवती करत असलेली योगासने पाहिली काय किंवा तिला सहजपणे शीर्षासन करताना पहिले की मनापासून समाधान होते.
(you tube वरती आपण cosmic yoga नावाने शोधल्यास हा मुलांसाठीचा खास योगाभ्यास तुम्हाला पाहता येईल.)
Bilingual शाळेची 2 वर्षे पाहता पाहता संपली. रेवती माझ्यापेक्षा ही छान स्वीडिश बोलू लागली. पण आता तिची स्वीडिश शाळा सुरू होण्यापूर्वी निर्णयाची वेळ आली होती. स्वीडिश शिक्षण पद्धती तर नितांतसुंदर आहे. पण भारतात परत यायचे तर थोडीतरी “अभ्यासपूर्ण” शाळा शोधणे गरजेचे होते. मनासारखी शाळा मिळण्यासाठी इथे देखील भरपूर प्रयत्न करावे लागतात. एका इंटरनॅशनल शाळेत सुदैवाने नंबर लागला आणि स्वीडिश शाळेतून इंग्लिश शाळेत रेवतीला घातले. ही इतर शाळांच्या मनाने नक्कीच ” अभ्यासपूर्ण” शाळा म्हणून प्रसिद्ध आहे.
शाळाप्रवेशाच्या सर्व प्रक्रिया पार पडल्या आणि सुरू झाला आमचा परत एका नवीन शाळेचा प्रवास. “Each ability is different” हे ब्रीदवाक्य असलेल्या ह्या शाळेत खरोखर प्रत्येक व्यक्तीमत्वातला घडवले आणि फुलवले जात आहे हे आम्ही पाहतोय.
शाळा सुरु होण्यापूर्वीच्या पालकसभेत सुट्ट्यांमध्ये मुलांकडून, शाळेच्या पूर्वतयारी साठी मुलांना काय येणे अपेक्षित आहे ह्याची यादी देण्यांत आली. त्याचबरोबर शाळेची नियमावली देखील आम्हाला सुपूर्त केली.
ऑगस्टमध्ये शाळा सुरू झाली. आम्ही नुकतेच भारतातून आल्यामुळे रेवती देखील खूपच उत्साहात होती.
आंतरराष्ट्रीय शाळा असल्याने अनेक भारतीय मुले ह्या शाळेत आहेत. अनेक भाषा असलेली भारतीय मुले पाहून रेवती ही खुश झाली.
शाळेच्या दारातून तिने आनंदाने टाटा केल्यावर मला एकदाचे हुश झाले.
शाळेच्या पहिल्या काही दिवसांमध्ये सगळ्यात लक्षात राहिला तो 13 सप्टेंबर चा Roald Dahl ह्या लेखकाचा वाढदिवस!
वाढदिवसाच्या काही दिवस अगोदर सगळ्या मुलांनी ह्या लेखकाची अनेक पुस्तके वाचली होती , त्यामुळे गोष्टींमधली पात्रे सगळ्या मुलांना माहित होती. वाढदिवसाच्या दिवशी आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेचा पोशाख करून जायचे आहे अशी सूचना मिळाली आणि त्या दिवशी सगळी मुलं वेगवेगळ्या पात्रांच्या पोशाखात शाळेत गेली. कुणी राजकुमारी ,कुणी बिली नावाचा पेलिकन पक्षी , कुणी पोलीस तर कुणी चोराच्या पेहरावात. सगळ्यात गम्मत म्हणजे दारात गेल्या गेल्या सगळी मुले दचकून मागे जात होती कारण हुबेहूब पोलिसाच्या वेशात होत्या त्यांच्या आवडत्या शिक्षिका ज्या त्यांच्या स्वागताला दारातच उभ्या होत्या. अश्याप्रकारे पुस्तके, लेखक, मुले आणि वाढदिवस खरोखरच सगळ्यांनाच शाळेने हसतखेळत एका सूत्रात बांधले होते !
वाचन हे तर ह्या शाळेत रोजचेच. शाळेत जाताना रोज कोणतेही पुस्तक, वही , पेन्सिल काहीही न्यायचे नव्हते तर शाळेत जाताना घेऊन जायची होती फक्त एक पुस्तकांची बॅग. गृहपाठ काय तर रोज एक पुस्तक वाचून यायचे. खास मुलांसाठी तयार केलेली ही गोष्टींची पुस्तके वेगवेगळ्या लेवलमध्ये विभागली आहेत. सगळ्यात आधी सर्व मुलांना लेवल १ चे पुस्तक देण्यात आले. आता ८ महिन्यांमध्ये लेवल -६ चे पुस्तक रेवती अगदी सहजपणे वाचते. शाळेमध्येही वाचनावर भरपूर भर दिला जातो. पुस्तक घरी देण्यापूर्वी मुले शिक्षकांबरोबर देखील रोज काही पाने वाचतात जेणेकरून शिक्षकांना देखील त्या मुलांची वाचनातील प्रगती कळते. शिवाय रोज रोज शब्द डोळ्याखालून गेल्याने स्पेलींग पाठ करायची वेळ येत नाही. आताही शाळेतून आल्याआल्या पुस्तकात पुढे काय असेल ह्या उत्सुकतेपोटी पुस्तक आपापलेच ती वाचायला सुरुवात करते. शाळेतून येणारी पुस्तके तर इतक्या वेगवेगळ्या प्रकारची असतात की ज्यांनी मुलांना सर्वांगीण ज्ञान मिळेल. गोष्टी, प्राणी, पक्षी ते वेगवेगळ्या मुलांनी करता येण्यासारख्या पाककृती अशी विविधरंगी पुस्तके मुलांचा वाचनप्रवास अजून रंजक करतात.
हे सर्व चालू असताना, मराठी भाषेचा संपर्क तुटू नये ही आम्हा दोघांची प्रामाणिक इच्छा होती कारण मातृभाषेतील साहित्याचा आस्वाद जसा आम्ही घेतो तसाच तिला देखील सुलभपणे तो घेता यावा ही त्यामागची भूमिका आहे. मग भारतातून येताना सुलभ वाचनाची मराठी पुस्तके आणली आणि इंग्लिश पुस्तकाबरोबर सुरू झाले मराठी वाचन आणि ह्याही उपक्रमात ती छान साथ देत आहे. इंग्रजी वाचनानंतर एक तरी मराठी पान तिने वाचले तरी आतून आम्ही सुखावतो आणि ती ही आता मराठी पुस्तके आनंदाने वाचते.
पाहता पाहता , नवीन शाळेत रेवती छान रमली होती. एक दिवस शाळेतून येता येता अचानक तिने मला प्रश्न विचारला , ” आई, तुला Amelia Earhart माहिती आहे का ?”. तिच्या ह्या प्रश्नाने मी गोंधळून गेले कारण मला खरंच माहिती नव्हते की ही स्त्री कोण आहे. मग तिने मला सांगितले की ही अमेरिकेची एक महिला वैमानिक होती जिने पहिल्यांदा अटलांटिक समुद्र विमानाने पार केला.
रेवतीच नव्हे तर इथे शिकणारी मुले कधीही असे प्रश्न विचारू शकतात कारण त्यांच्याकडे माहितीचे प्रचंड स्रोत शाळांमधून उपलब्ध होतात. मग कधी ह्या मुलांना मायकल जॅकसन विषयी माहिती हवी असते तर कधी डायनासोर विषयी, कधी चक्रीवादळांविषयी, कधी समुद्री जीवनाविषयी, तर कधी सामी संस्कृतीविषयी, तर कधी जगातील खंडांविषयी ,तर कधी पिरॅमिड विषयी, तर कधी रेन फॉरेस्ट विषयी. शाळेमध्ये मुलांपर्यंत ही माहिती पोहचावी म्हणून विविध विडिओ मुलांना दाखवले जातात. मग चालता बोलता ही मुले तुम्हाला कधीही नवनवीन गोष्टी कधीही सांगू शकतात. तसेच वर्गातही विविध देशांचे विद्यार्थी मित्र मैत्रिणी असल्यामुळे हसत खेळत मुले स्वतःच्या देशाविषयी माहिती इतर मुलांशी शेअर करतात.
शाळेमध्ये विज्ञान , भूगोल, गणित , भाषा असे विविध विषय असतात. अर्थातच हे सर्व विषय मुलांना अगदी अनौपचारिक पद्धतीने शिकवले जातात. गणित वर्गात सापशिडी खेळून सुरवातीला शिकवले , विज्ञानाचे अगदी छोटे छोटे प्रयोग वर्गात मुले शिक्षकांबरोबर वर्गात करतात आणि घरी आल्यावर देखील वेगवेगळे प्रयोग करायचा प्रयत्न सुरु करतात. भूगोल विषयामध्ये खंड शिकवले की छोट्या छोट्या प्रयोगांमधून त्याची प्रात्यक्षिके समजावली जातात. जसे आज जर मुलांनी tunnel ह्या विषयावरती माहिती घेतली तर वर्गात क्राफ्ट च्या माध्यमातून मुले विविध बोगदे तयार करतात. तर कधी प्रत्यक्ष मातीचे बोगदे देखील मुले तयार करतात. ह्या सर्व प्रयोगात लक्षात राहिला तो एक प्रयोग तो म्हणजे एक दिवस शिक्षकांनी मुलांना बागेत वेगवेगळ्या प्रकारची पाने दिले. मुलांना शोधायचे होते पानावरुन झाड. खरोखरच किती सुंदर पद्धतीतून मुलांना निसर्गाच्याही जवळ नेले आणि त्यांच्याही नकळत त्यांना बरेच काही शिकवले जाते.
इथल्या शाळेमध्ये वर्षभरात रेवतीला दोन प्रोजेक्ट आहेत जसे ह्या वर्षी तिला fairy tale आणि दुसरा डायनासोर्स. मग ह्या पहिल्या प्रोजेक्ट मध्ये वर्गात मुलांना पऱ्यांच्या गोष्टी सांगितल्या , मुलांनी स्वतः पऱ्यांच्या गोष्टी लिहिल्या , पऱ्यांची चित्रे काढली आणि सरते शेवटी ही सगळी मुले व शिक्षक सगळे मिळून इथल्या “junibacken” नावाच्या खास ठिकाणाला भेट दिली जिथे मुलांनी खास गोष्टीची सफर केली ती ही आपल्या आवडत्या वर्गमित्रांबरोबर.
दुसऱ्याही प्रोजेक्ट मध्ये तसेच मुलांना डायनासोर्स ची चित्रे काढणे, चित्रे रंगवणे, विडिओ बघणे आणि शेवटी इथल्या natural history museum ला वर्गभेट. अश्याप्रकारे दृक, श्राव्य तसेच चित्रकला, क्राफ्ट अश्या विविध माध्यमातून केलेली विषय हाताळणी खरोखरच स्तुत्य आहे आणि तिच इथल्या शिक्षणाचा पाया आहे.
साधारण ह्या वयातल्या मुलांना असतो लिहायचा कंटाळा. मग ह्या कंटाळ्यावरही शाळेनी उपाय शोधला. वर्षाच्या सुरवातीलाच शिक्षकांनी पेली (इथे नाव बदलले आहे) नावाचे घुबड आहे व त्याला आपल्याला पत्र लिहायचे आहे असे शिक्षकांनी मुलांना सांगितले. मग आठवड्याच्या गृहपाठात मुलांना पत्राचा विषय दिला जातो आणि मग मुले पेली ला दर आठवड्यात पत्र लिहितात. विषय खूप गमतीशीर असतात जसे ‘बरणीत एक मुलगी अडकली आहे ‘ ,मग हे चित्र पाहून मुलांना काय वाटते , किंवा एखाद्या आठवड्यात पेली घरट सोडून निघून गेला आहे , तुम्हाला कसे वाटते त्याविषयी लिहा , कधी कधी तुम्ही तुमच्या कोणत्या शोधामुळे ओळखले जावे ह्याविषयी पेली ला पत्र लिहा. अश्या विविधरंगी विषयांनी मुलांची कल्पनाशक्ती इतकी छान तयार होते की काय सांगू. अचानक दिलेल्या विषयावर मुले २ ओळी का होईना, चुकीचे स्पेलिंग का असेना लिहिण्याचा प्रयत्न करू लागतात. स्पेलिंग चुकले तरी वर्गातील शिक्षक कधीच रागवत नाहीत. पण मुलांचे कौतुक करून, त्यांना लिहून व्यक्त होण्यास प्रोत्साहनच देतात.
कौतुकाची थाप मिळाली की मोठ्यांना आनंद होतो तर मुलांचा आनंद तर किती आभाळभर असेल. शाळेत कौतुकातुनही संघटन कौशल्य विकसित केले जाते. वर्षाच्या सुरवातीला वेगवेगळ्या गटांमध्ये पूर्ण शाळेतील मुलांची अशी काही विभागणी केली जाते की प्रत्येक मुलाने मिळवलेले टोकेन हे त्याच्या शाळेच्या टीम ला मिळते . मुलांना शाळेतील कोणत्याही वर्गातील मुलगा किंवा मुलगी असो, तो आपल्या टीम चा असल्यामुळे ओळखीलचा देखील असतो आणि ही पद्धत आपोपाप एक समूह भावना निर्माण करते.
ह्या व्यतिरिक दोन वेगवेगळ्या वर्गांना एकत्र खेळायची संधी वेगवेगळ्या दिवशी देतात त्यामुळे शाळेतील प्रत्येक मुलाची ओळख इतर वर्गांमधील मुलांशी होते. मोठ्या वर्गातील मुले देखील आपल्या टीम च्या लहान वर्गातील मुलांकडे लक्ष ठेवू लागतात आणि वेगवेगळ्या शालेय उपक्रमांमध्ये आपल्या टीम साठी जास्तीत जास्त टोकन मिळावेत म्हणून ही सर्व मुले समूहाने प्रयत्नशील असतात.
रेवती लहान असताना व ती मोठी झाल्यावरही दोनदा तोतोचान हे पुस्तक वाचण्यात आले. जपानमधील तोमोई विद्यालयात शिकणाऱ्या तोतोचान आणि तिच्या शाळेच्या गोष्टी कुठेतरी मनात घर करून गेल्या होत्या. तोमोई मधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि मुले , आजही आदर्श शाळा हा विषय निघाला की डोळ्यासमोर येतात. अशा शाळेत तिने शिकावे, हे आमचे स्वप्न सत्यात उतरले आहे ह्यावर अजूनही विश्वासच बसत नाही……………….
वर्गात सगळ्यांच्या आधी मी च गेले पाहिजे असा लहानपणापासून प्रत्येकाचाच आग्रह असतो. तसेच ह्याही शाळेत सगळ्याच मुलांना आपापल्या वर्गात पहिल्यांदा जायचे असते. ओळीने उभे राहिले तरी भांडणे आली , ढकलाढकली आली , एकमेकांना मारणेही आलेच. अगदी देश कोणताही असो , मुले मात्र सगळीकडे सारखीच ना हो !
एक दिवस शाळेत अशीच ओळीवरून दोन मुलींमध्ये भांडण जुंपले. मुख्याध्यापक तिथेच होते. ते पटकन मुलांजवळ आले आणि म्हणाले, “मी ओळीत उभा आहे. मागचा माणूस आला आणि मला धक्का मारून पुढे गेला, तर मी त्याला धक्का मारणार नाही कारण मी खूप चांगला आहे हे मला माहित आहे त्यामुळे मी विनाकारण त्याच्याशी वाद घालत बसणार नाही, तर त्याला जागा देईल कारण मी माझ्या आईला वचन दिले आहे मी नेहमी एक चांगला मुलगा असेल. ” झाले , एवढ्याच बोलण्याने दोन मिनिटांमध्ये भांडणेही मिटली आणि मुलेही पटकन कोणतीही गडबड न करता जागेवर गेली. खरोखर मुलांना किती शांतपणे आणि कमीतकमी शब्दांमध्ये परिणामकारकरीत्या समजावून सांगता येते ह्याचे हे एक उत्तम उदाहरण.
साधारण मुख्याध्यापक म्हणाले की आपल्या डोळ्यासमोर चित्र येते, कायम केबिनमध्ये बसणारे, कधी कधी वरांड्यातून चकरा मारणारे, अचानकपणे वर्गात डोकावणारे , बक्षीस समारंभास प्रमुख पाहुण्यांबरोबर बसणारे, दरारा असणारे आदरणीय व्यक्तिमत्व.
ह्या शाळेचे मुख्याध्यापक तर काय सांगावे! अत्यंत साधे, तेवढेच कडक, कधी मुलांमध्ये मुल होणारे तर कधी तेवढ्याच कडक शिस्तीत मुलांना रागावणारे देखील. मला तरी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात मुले आणि मुख्याध्यापक एकत्र जॉगिंग करताना दिसले नाहीत ते मला ह्या शाळेत अनुभवयास मिळाले. सकाळी मुले आली की रोज शाळेतील मुले आणि मुख्याध्यापक सर्व मिळून समोरच्या मैदानाला ५-६ चकरा मारून रोज व्यायाम करणार! मुलांचा पुढचा दिवस चांगला जावा त्यासाठी किती ही धडपड. शाळा सुरु होण्याआधी रोज सगळ्या मुलांबरोबर अनौपचारिक गप्पा मारून सुरुवात करणाऱ्या मुलांच्या आणि मुख्याध्यापकांच्या मैत्रीचा अनुभव खरोखर वाखाणण्याजोगा.
शाळेत वर्गात मुलांची चुरस असते ती अजून एका गोष्टीसाठी ती म्हणजे आठवड्यातून मिळणाऱ्या ट्रॉफीसाठी . शाळेमध्ये मुलांच्या शिस्तीला किंवा चांगल्या सवयींना प्रचंड महत्व. शाळेमध्ये काळजी , सहकार्य आणि सौजन्य ह्यांना विशेष महत्व तसेच ह्या सवयींना प्रगतीपुस्तकावर देखील विशेष स्थान. शाळेतील शिक्षक सगळ्या मुलांच्या वर्तणुकीवर विशेष लक्ष ठेवून असतात. मग शाळेची सहल असो तेव्हा मुले एकमेकांना कशी मदत करतात , शाळेत कुणी नवीन मुलगा किंवा मुलगी आले तर कोण त्याच्याशी चांगले वागते, वर्गातील एखादी समस्या असो किंवा शिक्षक एखादी गोष्ट सांगत असताना लक्ष देवून एकणे असो. सगळी मुले ट्रॉफीच्या आशेने का होईना चांगले वागण्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करतात आणि ह्यातूनच हळूहळू वर्गमित्राची काळजी घेणे, दुसऱ्यांना सहजपणे मदत करणे, शाळेत शिक्षकांना मदत करणे, शिक्षकांशी आदराने बोलणे हे गुण त्यांच्याही नकळत वृद्धींगत होतात.
कौतुकाचा अजून एक प्रकार म्हणजे मुलांनी शालेय अभ्यासक्रमात एक पायरी वर चढली की प्रत्येक मुलाला एक Certificate of Progress मिळते. जसे मग ते गणित असो किंवा लिखाणातली प्रगती असो. काही दिवसांपूर्वी मुल जर २ ओळी लिहित असेल आणि आज वर्गात जर त्याने ५ ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या ह्या प्रगतीची नोंद शिक्षक घेवून त्याला कौतुकाची एक थाप नक्कीच देतात आणि ह्या कौतुकाने तर मुले अजूनच प्रगतीच्या वाटेवर चालू लागतात कारण त्यांनाही माहित असते प्रयत्नांती certificate मिळणारच आहे 🙂
एक कौतुकाची थाप मिळावी म्हणून सगळेच जण उत्साहाने अभ्यास करतात आणि हे certificate मिळावे म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा देखील करतात.
वेगवेगळ्या वर्गातील मुलांना एका वर्गात एकत्रितरित्या खेळण्याची संधी देखील शाळा कधी कधी मुलांना देते. मग एखादा शालेय उपक्रमांतर्गत जेव्हा लहान आणि मोठ्या वर्गातील मुले एकत्रितरित्या काम करतात तेव्हा मात्र रोजच्या दिनक्रमातून अचानक मिळालेल्या बदलातून मुलेही आपल्या मोठ्या वर्गातील मित्रांबरोबर बरेच काही सहजपणे शिकतात आणि मोठ्या वर्गातील मुले देखील आपल्या छोट्या वर्गातील दोस्तांना अगदी सहजपणे गोष्टी समजावून सांगतात.
तर अश्याप्रकारे हा आहे आमचा आमच्या पाल्याबरोबरचा आतापर्यंतचा शैक्षणिक प्रवास. पण मंडळी नाण्याची दुसरी बाजू देखील आहे बरे का आणि ती ही दुसरी बाजू बघू या पुढच्या आणि शेवटच्या भागात!
मागच्या सर्व भागांमध्ये आपण आमच्यासोबत इथला आमच्या पाल्याबरोबरचा प्रवास अनुभवला.
खरोखरच! आविष्कारांच्या ह्या देशात सरस्वतीचा वरदहस्त आहे. म्हणूनच स्क्रू साठी वापरायचा पाना, अनेकांना जीवनदायी ठरलेले पेस मेकर, जीवाश्म इंधन, कार मध्ये वापरण्यात येणारा Three Point Seat Belt, कपड्यांना वापरण्यात येणारी झीप किंवा चैन , ओट मिल्क, टेट्रा pack, संवादासाठी आपण वापरतो ते skype ह्या काही ह्यांनी सगळ्या जगाला दिलेल्या देणग्या. कला, विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य अश्या विविध विषयांमध्ये दिले जाणारे नोबेल चे पारितोषिक देखील इथूनच दिले जाते.
छोटासा असला तरी अत्यंत प्रगत, आधुनिक आणि मुक्त विचार आणि संस्कृती असलेला हा देश. प्रत्येक व्यक्तिमत्वाला घडण्याचा मुलभूत हक्क आहे हा ह्यांचा ठाम विश्वास. प्रत्येक व्यक्तिमत्वाचा आदर, त्याच्या विचारांचा, त्याच्या व्यक्त होण्याचा आदर ही ह्यांची मुळे. ह्याचे फलित देखील आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळते. जेव्हा केवळ दहा वर्षांची मुले भविष्यातला म्हणजे तब्बल २५ वर्षानंतरच्या स्वीडनचे स्वप्न बघताना व्यक्त होतात तेव्हा तोंडात बोटे घालण्याची वेळ येते. ही पोरे सहजरित्या आणि आत्मविश्वासाने सांगतात २०४५ मध्ये कोणीच ऑफिस मध्ये जाणार नाहीत तर फक्त virtual मीटिंग करून कार्यालय सांभाळतील, २०४५ मध्ये स्वीडनमध्ये शहरात प्रवासासाठी जास्तीत जास्त सायकल वापरल्या जातील, कार पुलिंग हे असेलच, ह्या शिवाय विजेवर चालणारी सार्वजनिक वाहतूक असेल , जीवाश्म इंधनाचा फक्त वापर असेल, शाळा ही घराच्या फक्त ५ मिनिटाच्या अंतरावर असेल. पुढच्या काळातील नौकरया ह्या Environment आणि त्याची काळजी ह्या विषयावर आधारित असतील. हे सगळे त्यांचे विचार एकूण खरोखर आपल्याला आश्चर्य वाटले नाही तर नवल.
मुल सात वर्षांचे होते तेव्हा आपल्याला एका परिपक्व मुलाची भेट शाळेकडून मिळालेली असते. म्हणूनच इथे ७ वर्षाचे मुल झाले की त्याला एकट्याने मेट्रो किंवा बस ने किंवा पायी प्रवास करण्याची कायदेशीर परवानगी मिळालेली असते. त्यांच्या प्रवासाच्या पास साठी ते आता तयार झाले असतात.
वयानुसार मुलांमध्ये होणारे बदल पालकांना दिसत असतात, जाणवत असतात जसे आपले मत अगदी स्पष्टपणे मांडणे (कदाचित आपल्याकडे ह्याला उद्धटपणा म्हणू शकतात ), ७ वर्षांची मुले घरातील चर्चेमध्ये अगदी खुलेआम आपली मते मांडतात, काही समस्यांवर आई वडिलांना प्रसंगी खूप छान तोडगे काढण्यात ही मुले सहजपणे आणि एका वेगळ्या दृष्टीकोनातून मदत करू शकतात.
वय वर्ष ७ हा येथील शिक्षणाचा पहिला टप्पा, टीन इज हा दुसरा टप्पा. ह्या विविध टप्प्यांमध्ये मुलांमध्ये होणारे बदल अगदी समोर दिसत असतात पण आपण काहीच करू शकत नसतो कारण परिस्थिती व काळानुसार मुलांच्या आवडी बदलत जात असतात आणि त्यांच्या वैध मागण्यांना पालक म्हणून आपल्याला मान्यता देण्यातच शहाणपण आहे. ४ थी , ५ वी मधली मुले डिस्को पार्टी करतात हे एकले की कुठेतरी काळजात धस्स होते. टीन एजर्स ला स्टेशन वर किंवा इतरत्र ड्रग विकताना पहिले की कुठेतरी खूप वाइट वाटते. टीन एजर्स ला वाढदिवसाला कोन्डोम भेट म्हणून देतात हे ऐकल्यावर भयंकर वाटते.
मुक्त देश , मुक्त वागणे हे इथे अगदी सहज. आपल्या देशात मुलांना ज्या गोष्टी फक्त चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतात त्या सर्व गोष्टी मुलांना इथे प्रत्यक्ष दिसतात. ह्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे त्यांची ह्या विषयांनबाबतची उत्सुकता कमी होते.
असेच एकदा शाळेतून येताना मेट्रो ने प्रवास करताना अगदी समोरच्या सीट वर एक जोडपे किस करताना पाहून मलाच खूप लाजल्यासारखे झाले आणि आता कोणता प्रश्न रेवातीकडून विचारला जाणार ह्या काळजीने माझ्या पोटात धस्स झाले. पण नशीब ! तिने देखील काहीही प्रश्न विचारला नाही. स्विमिंग क्लास साठी गेल्यावर पूर्णपणे नैसर्गिक अवस्थेत आई आणि मुलांना एकत्र अंघोळ करताना पहिले की कुठेतरी विचित्र वाटते कारण आपण ज्या संस्कृती मध्ये वाढलो आहोत त्याच्या हे अगदी विरुद्ध आहे. अर्थातच येथील लोकांच्या दृष्टीने ह्यात काही चूक नाही ते ही बरोबरच आहे.
मागे म्हणल्याप्रमाणे देश बदलला तरी माणूस नावाचा प्राणी सगळीकडे सारखाच असतो ना. इथे देखील गुन्हे भरपूर होतात मग ते मुलांच्या बाबतीत असो किंवा मोठ्यांच्या. इथेही मुलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कायदे आहेत आणि शाळेतून मुलांना ते वेळोवेळी सांगितले जातात. त्यामुळे मुले ही पूर्णपणे आपल्या हक्कांच्या बाबतीत सजग असतात.
परदेशात राहताना ही च मुख्य आव्हाने असतात पालकांसमोर. मुलांचे वय, मित्रपरिवार, शाळा , शिक्षक ह्या सगळ्याच गोष्टी कुठे न कुठे मुलांवर परिणाम करत असतात. मुले अगदी सहजपणे सांगतात की देवापेक्षा माझा विज्ञानावर जास्त विश्वास आहे. त्यांनी तसे म्हणण्यात काही गैर नाही. पण आपल्याही संस्कृतीशी मुलांना सतत जोडलेले ठेवणे हे पालकांसमोर मुख्य आव्हान असते.
त्यामुळे मुख्यत: प्रत्येक सणवार घरी आवर्जून साजरे करणे , त्याविषयी मुलांना माहिती देत राहणे तसेच पुस्तकांच्या माध्यमातून मुलांना भारतीय संस्कृतीची ओळख करून देत रहाणे , सणवार इथे साजरे करत असताना मुलांनाही मदतीत सामील करून घेणे, सणाच्या साजरे करण्याची कारणे त्यांना समजतील अश्या भाषेत समजावून सांगणे, त्यांच्याशी सतत संवाद साधत राहणे, त्यांचा एक व्यक्ती म्हणून आदर करणे , एखादी गोष्ट का करू नये ह्याचे त्यांना पटेल असे कारण देणे हे अत्यंत महत्वाचे आहे. आपण स्वत: भारतीय लोकांशी जोडलेले राहणे जितके महत्वाचे तितकेच येथील स्थानिक लोकांशी सुद्धा कौटुंबिक संबंध ठेवणे देखील इथे आवश्यक. मुलांना भारताविषयी कायम ओढ वाटली पाहिजे ह्याचे प्रयत्न करणे हे देखील तितकेच महत्वाचे.
आजही रेवती बरोबर ‘संभाजी’ मालिका दररोज बघत असल्यामुळे शिवाजी महाराज, संभाजी राजे, येसूबाई , सोयराबाई ही नावे तिच्या तोंडून सहजपणे येतात. अनेक वर्षांपूर्वी आपण लहानपणी पाहिलेले रामायण रेवतीबरोबर आम्हाला परत एकदा नव्याने कळले. ध्रुव बाल, भक्त प्रल्हाद, स्वामी विवेकानंद ह्यांच्या गोष्टी आजही जेव्हा ती आवडीने ऐकते तेव्हा मनातून आम्ही सुखावलो जातो.
एक सुजाण पालक म्हणून डोके पूर्णपणे शांत ठेवून त्यांच्याशी त्यांचे मित्र बनून राहणे हे खूपच आवश्यक. इथल्या समाजात राहून मुलांमधले बदल डोळसपणे बघून त्यांचीही बाजू समजून घेताना आपली मुलांना समजून घेण्याची कुवत वाढवणे तसेच समोर आलेल्या नवनवीन गोष्टींना धैर्याने सामोरी जाणे हे आवश्यक कारण प्रवाहाबरोबर चाललेल्या मुलांना थोडे का होईना आपल्याला प्रवाहाविरुद्ध जाण्यास शिकवायचे असते. उंच आकाशात झेपावणाऱ्या आपल्या पिल्लांना मुळांशी देखील घट्ट बांधून ठेवायचे असते कारण ते त्यांच्यासाठी चांगले आहे हे आपल्याला माहित असते.
पालक म्हणून आपण इथे १०० % प्रयत्न करणे हे महत्वाचे अर्थातच यश मिळणे न मिळणे ही पुढील गोष्ट.